Thursday, October 19, 2017

तो व ती ..1.0.2 श्री.

का डोळे जे सांगतात त्यावर विश्वास नाही ठेवत ...
का शब्दांच्या बुडबुडयांवर तरंगण्यात धन्यता मानते ती.
कधी त्याचे डोळे बोलतात कशीआहेस ..
अन ती मात्र पहात राहते ओठांकडे की हा एकदा तरी विचारेल कशी आहेस?
मग तिचे डोळे बोलतात काय रे कधीतरी विचारत जा की.
अन हा वेडा वाट पाहतो की ती म्हणेल
काय रे एकदाही नाही का आठवण आली अन विचारावेसे वाटले.
ते तसेच राहून जाते डोळ्यात अव्यक्त अन सुरु होते
ते हे.....
ती: कितीदा सांगितले आत येताना दार धाडकन नको लावत जाउस.
तोडशील एक दिवस दार....
तो: मी हळूच तर लावले ..
उगाच तुला माझात काहीना काही उणीवा काढायच्या असतात.
ती: तुलामान्यच नसते तुझी चूक कधीच ...
तू एकटा बरोबर आम्ही सगळे मूर्ख ना...
तो: आता आपल्या दोघात आम्ही सगळे कुठून आले?
बघ लागलीस तू बोलायला नेहेमीप्रमाणे.
ती: बघमूळ मुद्दा काय अन तू बोलतोयस काय..
तो: ....ती: ...तो::.........ती:........
तो..ती..तो....ती....तो....ती......
अन मग तिचे डोळे बोलतात अरे एकदा विचारलं असतस आल्या आल्या कशी आहेस तर.....
अन त्याचे डोळे म्हणतात काय ग एकदा म्हणाली असतीस खूप आठवण येत होती बरे झाले आलास आत्ता ते.....
तो निघून जातो आपल्या डोळ्यातील भावांसकट
अन ती उभी टेरेसवर घेऊन डोळे भरलेले अन त्यात ते भाव तरळलेले..
श्री....September 6 2016 

अजून ती बिकट वाट ... (कविता) श्री ..

llअजून ती बिकट वाट चालतोची आहे ..
सभोवतीची एक साद शोधतोची आहे ll
llकलेच्या अनेक छटा संगतीस घेउनी ...
कलेची एक छान वीण गुंफतोची आहे ll
llसोबतीस असंख्य मैत्र जडत जात असताना...
सहनाभवतू सहनौ भुनक्तू जगतोची आहेll
llचुकत पडत फिरुनी परत उठत मी..
अजूनही नवी वाट एक शोधतोच आहेll
llमध्यान्नीच्या मध्यलयीच्या धुंद सूरात या..
मारव्याची तिन्हीसांजही पाहतोच आहे ll
llकाय आले अन राहिले काय किती ते.
यापलीकडील समाधान धुडाळतोच आहेll
llअहम च्या सीमेपल्याड जाण्याच्या यत्नातच..
वयम चे अनेक हात आता गुंफतोची आहेll
श्री...August 20 2016

नियम भूमितीचे माणसांच्या विचारांचे (ललित ) श्री .

परवा भुमितीचे कलेतील नियम एकत्र शिकताना काही वेगळे गवसले..निमित्त एका कार्यशाळेचे..एका अवघड अशा पॅटर्न कडे पहाता पहाता त्यातील एक नियम गवसतो आणि सारे कोडे उलगडू लागते. जसा जसा पुढे जातो तसे समजते की किती सोप्या नियमांचे पुनरावृत्तीतून असे अवघड डिझाइन बनले आहे. आणि मग सारे सोपे वाटू लागते. काही क्षणात त्याच नियमाना धरून कितीतरी सौंदर्यपूर्ण रचना आपण बनवू लागतो. थोडक्यात काय तर क्लिष्ट रचनेतही सोपे नियम जाणणे महत्वाचे. पण होते काय सुरुवातीला आपण सारी रचनाच एक नियम समजतो आणि काही आकलन होत नाही.
रचने पेक्षा त्यातील पॅटर्न महत्वाचे..
माणसांचेही तसेच होते..आपण संपूर्ण माणूस पहातो आणि त्यावर शिक्का मारतो. अमूक असाच अन अमूक तसाच.
जर त्यातील पॅटर्न पाहिला तर त्याच्या वागण्याचे सोपे नियम समजू शकतील..कोणी गोलाकर नियमात ठराविक प्रकारे वागतात..कोणी त्रिकोणीय पद्धतीने ब-याचदा सरळ तर काही विशिष्ट प्रसंगी टोकेरी होउन बोचतात. काही ठराविक चौकटीत लहान मोठ्या पद्धतीने वागतात. तर काही स्वच्छंदी मुक्त वळणे होतात एकमेकात गुंफलेली. काही अंतरा अंतरातील ठिपके जोडताना सोडलेल्या मोकळ्या ठिपक्यांसारखे सगळ्यात असूनही नसलेले..तर काही कर्ण आणि त्रिज्येसारखे जाता जाता आजूबाजूच्या सा-याना छेदून जाणारे.
काही गडद भरलेल्या रंगांसारखे आपले सर्वस्व व्यापून टाकणारे..तर काही नाजूक नक्षीसमान चौकटी तल्या ..काही सरळ उभे तर काही कललेले उभ्यावर आधारासाठी.
अशा नियमांकडे लोकांच्या वागण्याच्या जर बारकाइने पाहिले तर जाणवते, कोणिच पूर्णवेळ वाइट वा चांगला नसतो तर तो असतो त्या व्यक्तिचा behavioural pattern. आणि जर हे समजू लागले तर आपल्याला आपला एक पॅटर्न ठरविणे शक्य होइल. जसे रांगोळी मेहेंदी काढताना आपण उपलब्ध जागा आणि सामान याचा विचार करून काय काढायचे ते ठरवतो..तसे समोरच्या माणसाशी त्या त्या क्षणि कसे बोलायचे हे ठरवू शकू आपण.
त्याच वागण्य्याचे छोटे नियम कळाले तर विशष्ट पद्धती लाक्षात येतात लोकांच्या.
आणि मग सोपे नियम त्यामागील कारणे दिसतात आणि लोक असे का वागतात ते समजू लागते..
निमित्त भूमिती ठरले मात्र एका नविन विचाराला चालना देउन गेले.
श्री..August 2 2016

Sitting alone in rain shree..

sitting alone all drenched in rain....
soaked in the thoughts....
forgetting the world around and to oneself...
the sparkling droplets
and the world reflected in them
like the memories refleting in mind...
the rings expanding and merging into each other
...the instances overlap...
the moments creating rhythmic repetition of feelins resonations and reverbs of life...
forgetting ones self and revisting yourself at the same time
Shri...July 29

सोड घरटे ... (माझा मुलगा गंधार याच्यासाठी लिहिलेले दोन शब्द ) श्री ..

सोड घरटे तरच घेशील आभाळ कवेत...
मोज उंची अन घे अंदाज तुझा झेपेचा...
जाण खोली जर कधी आलीच वेळ जमिनीकडे यायची घ्यायला क्षण एक विसावा...
होउदे आता सवय तुला उष्ण शीत लहरींची..
येउदे रग तुझा अंगी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करायची...
हवाच असेल आधार तर शोध आमच्या विचारात आणि संस्कारात...
जर आता नाही आला अंदाज तुला तुझा ताकदीचा तर उडणार कसा???
नको करूस स्पर्धा कुणाशी अन तुलनाही..
तरच होशील तुझा तू खरा तू...अन करशील पादाक्रांत एक एक करीत यशोशिखरे...
उड आताच वेळ तुझा आहे अन प्रवासही तुझाच...
श्री...July 1

तो वाडा .. श्री .

आज जे हे मोडके वासे दिसताहेत इथे पुर्वी एक चौसोपी वाडा होता..भले मोठे दगडी भिंतिंच्या मधील लाकडी प्रवेशद्वार ..दोन्ही बाजूला कोनाडे...उंच दगडी पाय-या ...बाहेर पितळी टोकदार खिळे अन त्यांच्या मागे फुले पितळी नक्षीदार....त्या दाराचा कर्रर्र ...असा येणारा आवाज ...त्याच्यावर चार पाच पोरटे लटकून एकाने ढकलायचा खेळ म्हणजेच तेव्हाचे ॲडव्हेंचर झोन होते...एकतर इतका जड दरवाजा हात सापडला तर बोटाचा तुकडाच पडणार...अणि दुसरे म्हणजे वाड्यातील खाष्ट आज्जी तिच्या ताब्यात सापडले की तिच्या शब्दांचा मारा आणि हातातल्या काठीचा चुकुन पायावर बसणारा मार .
असा मल्टीपल ॲड्वेंचर झोन तो वाड्याचा दरवाजा...
आत गेल्यावर चहूबाजूला खांबांची रांग लाकडी...आणि आत खोल चौक...त्यातील पाण्याने भरलेली दगडी...बाजूला टांगलेला पंचा..एका कोपर-यात उखळ मुसळ उभे...पलिकडे नक्षीच्या कड्यांचा झोपाळा खुणावतोय..वाड्याचे मालक शेताकडे वा बाजारात जायची खोटी की आजूबाजूची भुतावळ (हा त्या आज्जीचा खास शब्द आमच्यासाठीचा) कल्ला करायची झोपाळ्यावर...आज्जी खाष्ट पण मायाळूही...हळूच ज्वारीच्या लाह्या..चणे फुटाणे, बत्तासे, गुळ दाणे असे काहीतरी आणून द्यायची...म्हणायची "कार्ट्यानो दम दम दमाल झोका खेळून अन जाल तसेच रांजणाकडे पाणि.प्यायला ...आधी दोन दाणे तोंडात टाका हो..नहीतर नळ भरले पोटात तर येतील भांडायला आइबाप तुमचे..."
त्या वाड्यात छायाप्रकशाचा एक गमतीशीर खेळ चाले...सकाळी कुठूनशी एक उन्हाची तिरीप थेट कोप-यातल्या देवघराशी पोहोचे...तेथे आजोबांचे एकीकडे स्तोत्रपठण एकीकडे पुजा आणि एकीकडे हातवारे मधेच आवाजातील चढउतार याद्वारे सुचना , दटावणे असे मल्टीटास्किंग चालू असायचे...त्यांची पूजा होता होता ती उन्हाची तिरीपही गायब व्हायची...मग दुपारी चौकातील पांढरे फट्ट उन आणि त्याच्या परावर्तनात उजळलेला चहूबाजूचा व्हरांडा...
मात्र त्या पलिकडील खोल्यांमधे उजेड मोजकाच...एक आज्जीची खोली अंधारी ..एक कोठीची खोली कुलुपबंद..एक मालकांची प्रशस्त खोली ...बाजूने एक भिंतीतील अरुंद जिना माडीवर जाणारा जिथे फार कमी जायला मिळायचे ...या वाड्यासमोर आमचे घर..चार खणी ...
त्या काळात थोडा जातीभेद असे गावात त्यामुळे काही मुलाना ठराविक रेषेपलिकडे जाउ दिले जात नसे..मग अम्ही पण जात नसू...काकू म्हाणायच्या अरे तुम्ही या रे..पण नाही...आजीसोबत गेलो की स्वयंपाकगृहात जायचो..एक कडेला मोठी चूल..मोठ मोठे तांब्यापितळेचे हांडे..लाकडी मोठी फडताळे..वर टांगलेली शिंकाळी..आणि सोबत ताटली किंवा वाटीत मिळणारा खाउ..गुळपापडीचा लाडू..काकवी ...लाह्या...खोबरे ..दाणे..अशा वड्या...कधी बोरे..कवठ ..चिंचा..सिताफळ...काहीना काही यायचे समोर...त्या धुराने काळवंडलेल्या भिंती...भाकरी चा खरपूस वास..निखा-यांवर गरम रहाण्यासाठी ठेवलेल्या भाजी आमटीचा असे संमिश्र अनुभव..
वाडा ही एक इकोसिस्टीम असते हे आता मागे वळून पहाताना जाणवते...मागे परसदारी आताच्या भाषेतले किचन गार्डन..बाहेर जाणा-या पाण्यावर आळू..सोनटक्का ..पुढे कढीपत्ता ..लिंब .सिताफळ...काकडी भोपाळ्याचे वेल होते...
त्या वाड्याशी एक वेगळेच नाते जसे आमच्या घरा अंगणाशी होते तसेच...मागे न्हाणीघर आणि त्यातच आड..(आड म्हणजे छोटी विहीर..बोअर वेल चा ग्रेट ग्रॅंड्फादर) त्यावर रहाट..हवे तेव्हा पाणि शेंदून घ्या ताजे ताजे..थोडे कष्ट पडत असल्याने आपोआप पाणि जपून वापरले जायचे...न्हाणीत एक बंब (हॉट वाटर गिझर ओन फायर विथ वूडन पॅलेट्स)
हे मुलांचे अजून एक थ्रिल असे...त्यात वरून लाकडाच्या ढलप्या...शेंगांची टरफले ..शेणाच्या गोव-या टाकायला मज्जा वाटे...मग जास्त टाकले की धूर होइ मग कोणितरी मोठे ओरडण्यापूर्वी आम्ही गायब होत असू..
आज त्या वाड्याच्या अवषेशांचे छायाचित्र एका ग्रूपवर शेअर केले आणि कोणितरी म्हणाले हाउ ब्युटीफुल इस युअर व्हिलेज...सारे पडके किल्ले...भग्न अवषेश यातच सौंदर्य शोधणारे आपण शहरी लोक...हे तेव्हा जाणवले आणि या वाड्याच्या आठवणिंचा पट डोळ्यासमोर आला...पुढे त्या वाड्यातील मुले शहराकडे गेली...इतकी व्यस्त झाली की आता गावक-यानाही ते नक्की कुठे असतात माहित नाही...एक एक जिन्नस गायब होउ लागले..गेल्या वीस वर्षात दरवर्षी त्या वाड्याला एक एक वीट ढासळत पडताना पाहतोय..आणि आता तर समोरील भिंतही गायब नक्षीदार दारासकट....मात्र आठवणी आजही ताज्या...तो वाडा एका जुन्या मित्रा सारखा आणि आमचे घर मोठ्या भावासारखे ....वर्णन व भावनिक आठवणी लिहिताना काही गोष्टी आज जाणवताहेत...
वॉटर हार्वेस्टिंग आणि कंझर्वेशन..किचन गार्डन...सस्टेनेबल लिविंग..झीरो गार्बेज ..पॅसिव सोलार डिझाइन..एको फ्रेंडली मटेरिअल ..हे जे आज येता जाता वापरले जाणरे शब्द आहेत ते सगळे या अशा वाड्या घरांच्या डिझाइन मधे आपोआप अंगभूत होते...एक वेगळेच रिअलाइझेश थ्रू नॉस्टालजिक मेमरी
श्री...May 27 2016

तो व ती 1.0.1 श्री..

चल कुठेतरी दूर जाउ...ती त्याला म्हाणाली..
जिथे कुणी नसेल फक्त तू अन मी...
तु कविता कर मला वाचून दाखव...त्यावर मी म्हणेन काय रे किती जड जड लिहितोस...मग तू समजाव मला...
खरेतर मला कविता अधीच समजलेली असेल पण तू अजून बोलत रहावे आणि मी गुढघ्यावर हनुवटी टेकवून पहात रहावे ...
मग तू म्हणावे काढ की चित्र एखादे...मग मी काढेन माझी चित्राची वही...मी रेखाटू लागले की तू बसशील एकटक पहात शांतपणे...कधी माझ्याकडे कधी कधी निसर्गाकडे...
अन अचानक सुचतील शब्द तुला माझा चित्रासारखे प्रवाही...
मी रंगानी कविता करतेय...तू शब्दांनी काही चितारतोयस.....
मी मी अन तू तू उरणारच नाही ना मग...
सारे कसे भारलेले असेल एकरूपता की काय ती हीच असावी बहूधा...
मधेच वा-याची हलकी झुळूक माझ्या वरून तुझाकडे येइल अन तू एक अचानक आहsss... असे म्हणत भरशील एक दीर्घ श्वास...मी म्हणेन पागल आहेस तू एकदम.....
ती म्हणाली....."अरे उठ स्टेशन आलय....उतरायचे नाही का...
जाताना भाजी घ्यायचीये मला....तू जरा छोटूला कोचिंगवरून घेउन येशील...येताना...जरा इस्त्रीचे कपडे आणशील"...
मी म्हणालो..."अग असे काय करते ते चित्र तरी पूर्ण कर माझी कविता अत्ता कुठे जुळत होती"
चल जरा दोन स्टेशन पुढे उतरू.अन परत येउ....मग आहेच भाजी इस्त्री इत्यादी इत्यादी...
श्री...May 26 2016

रचना (ललित) श्री ..

रचना हा असा शब्द आहे...रचणे..आणि रचतानाच त्याच्या कलात्मकतेचे भान ठेवणे दोनही चे भान ठेवावे लागते...
घाई केली तर कलात्मकता बिघडण्याचा धोका ...
आणि रचताना एक एक विट परखून घेतली नाही तर ढाचा लेचापेचा होण्याची शक्यता...
त्यामुळेच काळ काम वेग यासोबत अजून एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे संवेदंशीलता...मग रचना कोणतीही असो..एक एक धागा विणत बनलेले वस्त्र असो...की एक एक वीट रचत जमलेली वास्तू...एक एक रंग शोधत चितारलेले चित्र वा एक एक सुर गुंफत जमलेली सुरेल सुरावट..
एक एका शब्दांची काव्यत्म पखरण किंवा चव अन सुगंध ओळखत जमलेला एखादा झकास पदार्थ..
हळूवार फुंकरीच्या द्वारे बनलेले काचशिल्प वा घण घण घाव घालत केलेले धातूकाम...
संगणकीय कळींच्या द्वारे बनलेली एखादी चित्र्फीत अथवा सुंदर कळ्यांचा गुंफलेला सुंदर गजरा...
जर या अशा सर्व कलात्मकतेला गरज असते संवेदनांची...
तर अशाच सुंदर समाजाची रचना का बरे आपण बळजोरीने करू असे आपल्याला वाटते..
जर असेच संवेदंशील बनलो आपण आणि सुरू केली रचना...
दोरा हळूवार गुंफला विचारांचा त्याचा फास बसू न देता...तापविले वातवरण फक्त थोड्या लवचिकते पुरतेच त्याची धग जाणवू देता...हलकेच चितारले चित्र छोट्या सहज साध्य बदलांचे पूर्ण कागदच रेषांच्या ताकदीने फाटू न देता..अन हे सर्व केले जर काळ काम वेगाचे योग्य भान ठेवत आणि सगळ्यांच्या संवेदना जपत ..तर नाही का होणार एक आदर्श समाजरचना सहज शक्य...तुम्ही म्हणाल हे तर स्वप्नरंजन झाले..पण एक सांगा रचना करायची तर आधी डोळ्यासमोर स्वप्नातील चित्र आकार घेतेच ना आणि मगच करतो ना आपण ते प्रत्यक्षात साकार? मग काय हरकत आहे आपण प्रत्येकाने असे संवेदंशील व्हायला ..आपले विचार अल्लद इतरांच्या विचारात सामावून गुंफायला...मग ठरवूच आपण की असाच एक समाज रचणारोत आपण आजूबाजूला...ज्याची बनेल एक सुंदर रचना आणि अशाच अनेक रचनांचा असेल आपला देश एक कलात्म सृजनशील आनंदी देश...
श्री...April 25 2016 

अहम ब्रह्मास्मी (ललित ) श्री ..

आभासी जग मागे टाकून..खोट्या मुखवट्यांच्या माणसांच्या दुनियेला मागे टाकून...
निरभ्र आकाशाखाली चांदण्याच्या नक्काशी बघत पहुडणे...काळ्याच्या असंख्य छटा...
कधी न जाणवणा-या त्यावर करड्या रंगात डोलणारे पाना फांद्यांचे आकार..
एक मंद धुंद तानपुरा रातकिड्यांचा...आणि त्यातच एक वा-याची प्रसन्न तान...
नकळत मन अगदी शांत होउ लागते...विचारांचा गोंगाट मागे पाडतो...
डोळे उघडे तरीही स्थिरावलेले. ..अहंकारमय सोहम चा अखंड चालणारा कोलाहल केव्हाच मागे सरलेला असतो....
कोहम?? ...
आता या क्षणी मी कोणीच नाही.. आहे एक नगण्य ठिपका ज्याचे अस्तित्वच मुळी असून नसल्यासारखे त्या उर्वरीत अगणित ठिपक्यांशिवाय..
काळ्यात काळा होउन सामावणारा.. की करड्या पानाच्या नक्षीत हरवलेला..
की मध्येच लुकलुकणा-या ता-यांच्या लपाछपीत असणारा अस्पष्ट पांढरा...एकरूपता निसर्गाशी... एकतानता त्याच्या तालबद्ध तरिही अनवट संगिताशी जुळलेल्या श्वासाशी...
कोहम??
कोण आहे मी...
मी नाहीच उरलोय आता.. तो तर कधीच उडालाय सावरीच्या अनेकानेक हल्लक रेषांसोबत आसमंती...
तोच हलकेपणा आता रोमारोमात भिनतोय चढत जाणा-या रात्रीसोबत.... आता तरंग अंतरंगीच्या उमटणा-या शांत लहरींचे अन त्यावर अलगद तरंगत निघालोय एका अद्भुत प्रवासाला...
निसर्ग हाच सखा आणि त्याच्या प्रेमाची अनुभूती हीच व्यापून राहतेय आसमंत सारा...
अनेक विखारी विषारी विचारांचा निचरा होतोय ठसठसणा -या अनेक जखमा पळभरात विरून गेल्यात...
शांत अजून शांत होतेय मन....सुखावतेय स्थिरावतेय अन पाझरू लागलेत डोळे नकळत...
किती साहिलेले दु:ख अन वाहिलेले ओझे आज इथेच सोडून दिले...
एक एक करून गळालेले मुखवटे अन त्याना चिकटून सरलेल्या राग द्वेष मोह मद मत्सरादी भावनांची जळमटे दिली भिरकावून...
आता उरलाय तो एक नि:शब्द निरागस निरामय ठिपका असलेलाही अन नसलेलाही त्याच नास्तित्वातील अस्तित्व जपणारा ..
कोहम? कोहम?...
असे म्हणतानाच निर्मितीचा सोहळा अनुभवत अचानक येणारा एक स्पष्ट आवाज
"अहम ब्रह्मास्मी"....
श्री....March 19 2016

एक एक तुकडा .. (कविता ) श्री ..

एक एक तुकडा आभाळाचा...
एका एक एक क्षण सुखांचा...
एक एक कवडसा प्रकाशाचा..
एक एक रंग फुलांचा..
अन एक एक शब्द प्रियेचा...
एक एक हात मायेचा ..
आणी एक एक स्पर्ष रोमांचांचा..
एक एक सूर तानांचा
अन एक एक ताल नाचाचा..
एक एक अनुभव जगण्याचा
अन एक एक धागा आठवणींचा..
एक एक करून साठत जावा..
अन भरून ओसंडावा..
हा मधुघट आयुष्याचा...
श्री...January 19 2016

प्रेमाविषयी...खलील जिब्रान यांच्या मूळ कवितेवरून .."On Love"


प्रेमाविषयी..
जेव्हा साद घालते प्रेम तुम्हाला, जा सरळ त्याच्या मागे,
जरी त्याचा मार्ग असेल खडतर,
आणि जेव्हा पसरेल ते पंख आपले, खुशाल जा त्यांच्या खाली,
जरी त्याच्या आतील छुप्या तलवारी देतील घाव गहिरे तुम्हाला,
आणि जेव्हा ते बोलेल ठेव विश्वास जरा माझावर,
करेल त्याचा आवाज जरी चूर चूर स्वप्नांना तुमच्या
जसे उत्तरेचा वारा ध्वस्त करतो बाग सारी...
कारण जेव्हा प्रेम तुम्हाला चढवेल सुंदर मुकुट,तेव्हाच देइल सुळीही.
जसे ते वाढवेल ते तुम्हाला तसेच छाटेलही काही भाग तुमचा तरीही.
जरी ते तुमच्या उंचीला आणि जोजवेल सुर्यप्रकाशी वाढणा-या धुमा-यांना ,
ते पोचेल तुमच्या जमिनीत घट्ट रोवलेल्या मुळांशी आणि हलवून टाकेल पाया समूळ.
जसे कणिसाच्या आवरणासारखे तेसामावेल तुमच्या मनाचा एक एक दाणा.
तेच करून टाकेल नग्न तुम्हाला सोलून सारी आवरणे.
जसे ते चाळून काढेल सारा फुफाटा तुमचा स्वच्छ,
तसेच ते भरडेल तुम्हाला सपाट होईपर्यंत.
आणि मग ते तुम्हाला पवित्र अग्नीत घेऊन जाईल,
ज्याने बनाल तुम्ही पवित्र प्रसाद त्या देवाचा.
या अशा गोष्टी प्रेम करीत राहील तुमच्यासोबत जोपर्यंत,
तुम्हाला कळणार नाहीत गुपिते हृदयीची आणि
त्याने सर्व ज्ञान होऊन जाईल एक क्षुल्लक भाग आयुष्याचा.
पण जर तुमची भीती इच्छील फक्त शांती आणि आनंद प्रेमाकडून,
तर तुम्ही झाका तुमची नग्नता आणि सोडा प्रेमाच्या घुसळणीचा प्रदेश
जा एका ऋतूहीन जगात जिथे हसाल पण,
नसेल सारा दु:ख आनंदाचा सोहळा नसेल ओघळणा-या दोन अश्रूंची साथ.
जेव्हा तुम्ही प्रेम करता नका म्हणू “देव माझा हृदयात आहे”
तर म्हणा “मी देवाच्या हृदयात आहे”.
आणि विचार करा की तुम्ही नाही प्रेमाचा मार्ग ठरवू शकत प्रेमासाठी,
जर ते समजेल तुम्हाला योग्य तेच दर्शविल मार्ग तुम्हाला.
प्रेमाला दुसरी कोणतीच आकांक्षा नसते स्वत:च्या आकांक्षा पूर्ती शिवाय
आणि तरी तुम्ही प्रेमात पडलात तुम्हाला अपेक्षा ठेवायच्याच असतील तर या ठेवा;
विरघळावे त्या खो-यांसारखे जी गातात गीते त्या रात्रींसाठी
समजावे दु:ख जास्त हळवेपणाचे
व्हावे जखमी तुमच्याच प्रेमातील समजूतदारपणाने
स्वखुशीने आणि आनंदाने व्हावे रक्तबंबाळ
उठावे पहाटे हृदयीचे पंख पसरून आणि मानावे आभार नव्या प्रेमभरल्या दिवसाचे.
घ्यावी क्षणभर विश्रांती दुपारी अन व्हावे ध्यानमग्न आसोषीत प्रेमाच्या
यावे सांजवेळी घरी कृताज्ञाभावाने..
आणि मग शांत पाहुडावे रात्री आपल्या हृदयीच्या प्रेमाप्रती प्रार्थनाभरल्या नेत्रांनी
ओठावर त्याचा स्तुतीचे असावे गाणे.
Shree..05.01.2016
Transcration of Khalil Gibran’s “ON LOVE”