Sunday, July 24, 2011

स्पर्श.....एका अनोख्या दुनीयेत घेउन जातो हा शब्द आपल्याला....

या दुनीयेची सफर सुरू होते अगदी बालपणा पासून....

अगदी पहिला श्वास घेउन जेव्हा येतो जगात...आपल्या मातेचा स्पर्श....अगदी पहिला स्पर्श ते छातीशी घेण...उब मायेची उमगते स्पर्शात...

हे उमगणं हळू हळू जाणिवेचं रूप घेतं....एखादं बाळ एकाकडे रहातं शांत आणि रडतं ईतरांकडे...त्या वयातहि हा खेळ असतो स्पर्शाचा..

मग अनेक स्पर्श उमगू लागतात...त्यातील भावना समजू लगतात.....

आइचा मायाळू स्पर्श...बाबांचा आश्वस्त अन अधारभरला स्पर्श...भावंडांचा मिश्कील तराही प्रेमळ स्पर्श....

मित्रांचा खांद्यावरचा हात...शिक्षकांची पाठीवरअली थाप...आजीने पकडलेला कान...एक ना अनेक असते ना ही अजब दुनीया...

अगदी व्यवसायाला कुठे गेल्यावरही बोलण्याची सुरूवात होते स्पर्शानेच...हस्तांदोलनाच्या रूपात.....अनेकदा हे हस्तांदोलन सांगून जातं काय होणार मिटींगचं फलित....

स्पर्श....

प्रेमळ....शांत....आश्वस्त....अस्वस्थ...आसूसलेले...कधी धास्तावलेले...कधी लाडीक...कधी तरल...कधी मादक..कधी दाहक

एक प्रसंग

मित्राची आई वारली होती ...भेटायला गेलो ...अनेकजण आले होते...वेगवेगळे प्रकार सांत्वनाचे...शब्दांचे खेळ...

एका बाजूला बसून काय बोलावं विचार करीत....निघालो बोलंलो काहीच नाही....दारात त्याच्या पाठीवर हात ठेवला हलकंसं दाबलं...डोळ्यात ओळखिचं पाहीलं...

नंतर अनेक दिवसांनी तो भेटला म्हणाला अरे त्या वेळी अनेक लोक भेटून गेले रे...बरंच सांत्वन केलं...पण लक्षात राहीला तो तुझा स्पर्श...सगळं सांगून गेला....

तेव्हा प्रथम जाणीव झाली स्पर्श नावाचं रसायन काय असतं त्याची...

अनेक वेळा जेव्हा व्यक्त होता नाही येत शब्दांनी ....सुचत नाही कसा संवाद साधावा...स्पर्शाच्या दुनीयेत ठेवावं पाऊल...

लाखो शब्द नाही सांगू शकत...ते एक स्पर्श सांगून जातो....

मनांची स्पंदनं जाणवतात स्पर्शातून....

अनेक गोष्टींचे स्पर्श असेच असतात....पहीला पावसाचा थेंब हातावर पडतो....गालावर फीरलेल्या मोरपीसाचा मऊशार .......

गुलाबी थंडितल्या गारव्याचा....शाळेत जाताना खिसा भरून घेतलेया चण्यादण्यांचा....

समुद्रकिनारी अनवाणी पायांना थंडगार वाळूचा...पतंग बदवताना काचणारा मांजाचा....

चावणार्या वाहाणेचा....वाहणार्या पाण्याचा....गाडीवरील रंगीत बर्फगोळ्याचा....पानातील गरमागरम पोळ्यांचा....

मनगटावर अलगद येऊन बसणार्या फुलपाखराचा....अन पायावरून जाणार्या झुरळाचा..

.दगडावरील निसरड्या शेवाळाचा....अन ताज्या रसरशीत फळाचा....

वळ्ताना हमखास लागणार्या कोपर्याचा....पळताना घर्षणार्या कपड्यांचा....संध्याकाळी बागेत चावणार्या डासांचा....

गुलाब हातात धरताना टोकदार काट्यांचा....मास्तरांनी मारलेल्या पट्ट्य़ांचा.....आईनी दिलेल्या रट्ट्यांचा...

प्रेयसीच्या गुद्द्यांचा...बाजेवर रुतणार्या वाद्यांचा....असे अनेकरंगी स्पर्श आणि त्यांची आगळी दुनीया...

अजून एक प्रसंग माजा एक मित्र आणि त्याची प्रेयसी...झालं मोठं भांडण....अबोला तिचा मनवणं याचं...काही केल्या ऐकेना...

चुक याचीच नेहेमीप्रमाणे....मोठ्या मिनतवारीने ती समोर यायला तयार झली...हा मनातल्या मनात खूप बोलत होता असंसमजावू तसं समजावू....

ती आली त्याचा बाजूला बसली अजून गुस्सा होता...त्याने एक नजर पाहिलं तिच्याकडे अन हलकेच हात ठेवला तिच्या हातवर...

.पाच मिनिटे तसेच बसले अलवार स्पर्शासोबत...तिचे डोळयात गहिवर याच्या स्पर्शात थरथर....

नंतर तो बोलू पाहता तिने ठेवला त्याच्या ओठांवर हात...म्हणाली " काही बोलू नको तुझा स्पर्श सारं काही सांगून गेला रे...

छोटा मुलगा...एकदा चूकला...न सांगता घरातून पैसे घेऊन गेला गोळ्या घेतल्या अन खल्ल्या...घरी कळंलं ...वडिलांनी जवळ बोलावलं..

मायेने डोक्यावरून हात फिरवला...मुलगा शांत ....वडीलांनी एक नजर पाहिलं मुलगा आपण होउन बोलला चुकीची कबूली दिली...बापाच्या कुशीत शिरून शांत झाला...

स्पर्शाची जादू इतकी की नुस्त्या एका स्पर्शाने होत्याचं नव्हतं अन नव्हत्याचं होतं होऊन जातं.

काही स्पर्श अतीशय नकोसे असतात...विशेषकरून भिन्नलिंगी नात्यांमधे असे अनुभव येतात.....बरेचदा आपल्या आजूबाजूला कोणी सांगतं कि अमूक व्यक्तीचा स्पर्श खूप घाण आहे...म्हणजे प्रेमाची जागा वासनेने घेतली कि स्पर्शाची जातकुळीच बदलते...वासना..ईर्षा...व्देश..मत्सर....याही भावना जरी वागण्यात लपविता आल्या तरी स्पर्शात नाही लपून रहात....

माझा एक अंध मित्र आहे...त्याची स्पर्शाची जाणीव इतकी तीव्र आहे नुस्त्या पाठीवरल्या थापेत तो विचारतो माझी मनस्थिती अचूकपणे...मीही प्रयोग करून पाहीला डोळे मिटून स्पर्शाची जाणीव तीव्रतेने समजली...

आपण जेव्हा स्पर्शाच्या अत्त्यूच्चं शिखरावर असतो ना तेव्हा डोळे आपोआप बंद होतात...आठवा एक घट्ट मिठी प्रियेची... एक अलवार चुंबन प्रियकराचं.... एक निरोपाचं हस्तांदोलन आवड्त्या मित्राचं..... एक डोक्यावरचा हात आपल्या गुरूस्थानी असलेल्या व्यकतीचा...एक गालावर घासालेला गाल चिमुकल्या बाळाचा...थोपटणं मायेने आईचं....खरंय ना मिटतात ना डोळे आपोआप....म्हणजेच सगळ्या जाणीवा एकवटतात त्या जादुई स्पर्शा मागे....

अनोळखी लोकानाही स्पर्शाने खूप देता येते...रस्त्याने जाताना एखादे आजोबा डगमगतात आपण पुढे जाऊन आधार देतो सरळ ऊभे राहील्यावर परत हातात हात घेतो बोलत काहीच नाही ते पण हलकेच थरथरत्या हाताने दाबतात आपला हात..

एखादा लहान मुलगा होटेलात टेबल पुसणार रोज पहातो आपण...एक दिवस न राह्वून बसवतो शेजारी खांद्याव हात ठेवून नाव विचारतो...तो सुखावतो खूप....

एखादी आजारी व्यक्ती ...भेटायला जातो आपण...हलकेच फिरवतो आपण...शांत भाव उमटतात समोर...

प्रचंड चिड्लेलं कोणी समोर आपण बाजूला नेतो त्याला...बसवतो पाणी देतो अन पाठीवरून हात फिरवतो.....जरा थंडावतो तो...

कोणी खूप आनंदात आहे...येतं समोर अन हातात हात गुंफून गोल गिरकी घेतं...आपणही साथ देतो...ती अजून सुखावते....

जर आपल्याला या स्पर्शाच्या जादूई दुनीयेत यावसं वाटत असेल...एकच करायचं....जाणीवा जपायच्या....फुलवायच्या....चेतवायच्या....

पहा एखादा स्पर्श आपलं जीवन ....आनंदी...समाधानी....सुखी ....शांत ....करेल......अंतीम स्पर्श असेल सर्वांगाला त्या धर्तीचा शेवटचा श्वास घेतानाचा...अन त्याचवेळी असेल साथ आयूष्यातल्या अनेक जादूई स्पर्शांच्या आठवणींची....मरणही सुखावह करतात त्या आठवणी...

एक शायर म्हणतो ना

"आखरी हिचकी तेरे जानो ने आए....मौत भी मै शायराना चाहता हूं...." हे प्रीये माझा शेवट्चा श्वास तुझ्या मांडीवर डोक असताना थांबेल....तर मरणही तुझ्या स्पर्शाने जादूई होईल गं....

अशी ही स्पर्शाच्या दुनीयेची जादूई सफर....


एखादा प्रसंग घडला आयुष्यात...खुप आनंदलो आपण की....डोळ्यातून दोन मोती ओघळतात...असेच दोन दोन बिंदूंची साठवण ...होतो आनंदाचा डॊह...

लहानपणी अगदी एखादा खाऊ, खेळणे वगैरे अगदी आपल्याला हव्वे तसे मिळाले तरी डोळे चमकतात...हि चमक म्हणजे ते मोती...साठवणीची सुरूवात..

आपल्यावर सारखं राज्य येतं...किंवा पत्त्यात आपणअच गाढव होत असतो अनेक डाव ...अचानक आपण सुटतो...जमतात ना दोन मोती..

शाळेत एखादं उत्तर आपण पट्कन देतो..पहिला येणाराहि न देउ शकलेल्या प्रश्नाचं...अचानक जाहिर कौतुक होत...पाठीवर कौतुकाची थाप...अजून दोन...

मैदानात सामना चालू आहे...आपण भले प्रेक्षक असतो...आपला आवडता संघ संकटात...हरतोय वाटता वाटता....जिंकतो आपलाच विश्वास नाही बसत...पण तही जेव्हा बसतो आपण लागतो नाचू...अन ते दोन लगता देउ साथ आपल्या गालांवर...

शाळेचं नाटक...आपली भूमिका म्हटलं तर महत्वाची ..म्हटलं तर नाही...नाटक संपतं...आपण बाहेर मुलांमधे येतो...आपल्याला आवडणारी पण कधी साध बोलण्याची हिम्मत नसणारी एक वर्गमैत्रिण सामोर येते नुस्तं खुणेनेच छान झालं हं...आपण स्तब्ध....ते दोन मात्रं प्रवाही...

मग कधीमधी मित्राशी भांडण होतं...रोज बोलणारे कायम एकत्र राहाणारे बोलत नाहीत...कळतय पण मी कि तो आधी यात वेळ जातोय...मग आपणच जातो सरळ नुसते पहातो आणि एकदम दोघेही म्हणतात जाउदे...गळामिठी न एकमेकांच्या खांद्यावर ते दोन दोन...

अचानक बाजारात आई आपण आणि भाऊ जात असतो....बोलता बोलता मागे पहातो तर भाऊ गायब...कुठे गेला कसा गेला...आपण आईला सांगतो...ती तर भेदरतेच...इकडे तिकडे पाहताना कळतं हे महाशय एका दुकानाच्या काचेतून आतली दुनीया पहाण्यात मग्न...आपन धावत जातो आईपण येते....पटकन त्याचा हात धरतो घट्ट...त्याला कळत नाही आई अन दादा का रडतात...ते दोन असतात ना सोबत..

एक ना अनेक बालपणी असे दोन कीत्येक वेळा साठत जातात...नाटक पाहाताना तो राक्षस मेला कि आनंद...बैलगाडीत गाडीवानाच्या शेजारी अन बसमधे खिड्कीची जागा मिळाल्याचा आनंद...सायकल पळविताना पायड्ल न मारता काही अंतर पहिल्यांदा जाणे...क्रिकेट्चा चेंडु एकाद्या रागीट काकांच्या आवारातू त्याना समजू न देता हलकेच काढून आणणे...गावी करवंदीच्या जाळीत शिरुन पोटभर करवंदं खाऊन वर पानाच्या द्रोणात भरून आईला आणून देताना तीच्या नजरेत ....आजोबांना पान लावून त्याचा वीडा कुटून त्यातला लाल रस ओठाना लावून लालचुटूक करण्यातला आनंद

जसे आपण मोठे होत जातो...ते दोन मोती बाहेर येण्याची वारंवारता कमी होतेय असं वाटू लागतं. ते तसं नसतं....आपणच त्याना आता नको लोक काय म्हणतील वगैरे म्हणत अडवतो...मला सांगा नाही का येत हो आनंदाश्रू अनेक प्रसंगात...प्रेमाला छान प्रतिसाद मिळाला तेव्हा.....पहिला स्वकमाईच्या पगार आला तेव्हा.....एखाद्या आवडत्या व्यक्तीला अचानक भेटला तेव्हा....आपलं पहिलं वाहन पहिलं घर एवढं कशाला अगदी पहिलं वहिलं घेतलेलं एखादं घड्याळ....आलेच होते ना हो ते दोन मोती प्रत्येक वेळी...

प्रसंग बद्लतात....मायनेहि बदलतात पण त्या मोत्यांचा साठा होतच जातो....आणि त्याच मोत्यांचा होतो आनंदाचा डोह...त्या आनंदाच्या डोहावर तरंगण्यात खूप सुखावतो आपण...

आज हे सगळं आठवण्य़ाला कारण ठरलं एका कार्यशाळेचं...

कर्ण बधीर मुलांमधे घेतलेल्या....जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हाच त्या मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि कुतुहल सारं सांगून गेलं.

आपला प्रत्येकाचा असा एक आनंदाचा डोह असतो.

कधीकधी याच आनंदाच्या डोहात तरंगताना अचानक आपल्याला बुड्ल्याचा भास हौउ लागतो. नाका तोंडात पाणि शिरतंय जीव गुदमरतोय असं वाटू लागतं. का घडत असाव असं?

एक तर जसं की आपली वाढत जाणारी अपेक्षा....किंवा आपल्याकडून असणारी अपेक्षा पुर्ण न करता येण्याची खंत...

ते दोन ट्पोर रहातात बाजूला न फ़ुटू लागतो बांध आपला....सुरू होते शांत डोहात हालचाल...उमटू लागतात गोलाकार वर्तुळं चिंतेची....भितीची....संकटांच्या चाहूली अन सावल्या नाचू लागतात...

याचं खरं कारण असतो आपणच...

आता या घटना आठवा..

आपण कुठून यशस्वी होउन येतो...आपल्या माणसांना सांगतो...ते आपल्याला हवे तसे नाही कौतुक करत आपलं..दुखावतो आपण..अन वाहतात आपले डोळे...

एखादी घटना आपल्याला अप्रिय घडून गेलेली...कधी बोलत असताना कुणाशी आठवण केल्यासारखा विषय निघतो...आपली खपली निघते..अन...

कुठे तरी चाल्लोय आनंदाने...रस्त्यात गाडी बिघडते...सगळे आपल्याव्रर बिघडतात....आपण प्रयत्न करतो समजावण्याचा...पण नाही...आपण जरा बाजूला जातो...अन...

असे प्रसंग असतात घडत...आणि आपणही असेच काहिसे असतो त्यावर खंतावत...अनेकदा हळू हळू असे हौउ लागते कि आपण प्रत्येक घटनेत आपल्याला किंवा इतराना दोषी मानू लागतो.

आनंदाचा डोह बनू लागतो दुःखाची गर्ता....

असतो आपण त्याच ठिकाणी घटनाही त्याच...पण ....हा पण खूप मह्त्वाचा....

त्या वर्तुळाकार गर्तेचा भोवरा नक्कीच नेणार तळाला...गुदमरणार जीव..होणार घुसमट...आणि फ़क्त आपणच त्यात बुडत जाणारे.....

ह्या आनंदाच्या डोहाच दुःखाच्या गर्तेत कधी रुपांतर होतं नाही कळत आपल्याला...

खरंच नाही का कळत की येत असतात संकेत आपल्याला...

आठवा कधी शेवट्चे पहिल्या पावसात भिजलात ....कधी शेवट्च्या रेघोट्या मारल्या भिंतीवर वा कागदावर....कधी शेवटचं मनापासून व्यक्त झालात आपल्या माणसांपाशी मोकळेपणाने....कधी शेवट्चे भट्कलात निरुद्देश ...कधी शेवट्चे तासनतास बसलात पाण्याकाठी...नाही ना आठवत.???????

म्हणजे मोठ्या प्रगतीच्या मागे धावताना छोटे आनंद हरवले ना....आपल्याच अपेक्षांच्या वाढलेल्या आकारात हरवतोय ना आपण.....मग मग मग....ते दोन टपोर येऊ पाहणारे ...येऊ द्या त्यांना खुषाल....करा मन मोकळं ...व्हा व्यक्तं ...हे व्यक्तं होणं म्हणजेच आपलं आपण असणं...पहा बरं करून आणि मग बघा परत एकदा तरंगू लागाल तुम्ही आनंदाच्या डोहात शांत निवांत...स्वच्छंदी अन आनंदी...

म्हट्लय ना आनंदाचे डोही आनंद तरंग...आनंदची अंग आनंदाचे..


आप्पा म्ह्टलं कि मन मागे मागे जाउ लागतं....किती काळ लोटला अप्पा गेले त्याला बारा वर्ष उलटली...पण अजूनही आप्पा हा शब्द मनात आला कि..जाड मिश्या..तुळतुळीत टक्कल..धोतर...बंडी...काळी टोपी..खणखणीत आवाज...जरब ...तरीही हळवं मन...राहातच चित्र समोर

आप्पा एक अजब व्यक्तिमत्व होतं...सगळ्या कुटुंबाला एक प्रकारचा धाक होता. आम्हा नातवंडांसोबत मात्र लहान व्हायचे. मोठ्यांना कायम हेवा वाटायचा त्यांच्या या लवचिकतेचा. माझ्या आप्पांच्या आठवणी अनेक स्तरांवर घेऊन जातात...त्यांचे त्या वयात सांगितलेली अनेक वाक्ये आयुष्याच्या अनेक टप्यांवर साथ देतिल याची जाणीव तेव्हा नव्ह्ती.

आप्पा म्हटलं तर मी पहातो तेव्हा पासून काहि करायचे नाहीत अन म्हटलं तर बरंच काही करायचे...पहाटे पाचला उठून मैलभर अन्तरावर कपर्दिकेश्वराला नदीवर अंघोळीला जाणे..सोबत त्यांचे मित्र आण्णा यांना वाटेत आवाज द्यायचे...हा नियम उन्हाळा,हिवाळा,पावसाळा कधीच चुकला नाही. अगदी दिवाळीच्या पहाटे सुध्धा पहिली आंघोळ नदिवर.. नंतर परत आजी, आत्या, आई यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा घरी आंघोळ अम्ही खूप हसायचो यावर.

कधितरी लहर आली कि विचारायचे मला चल येतोस का नदीवर मी वाटच पहात असायचो...थंड पाण्यात जाताना एक डुबकी पटकन मारली कि थंडी वाजत नाहि हे पहील्यांदा अप्पांनी उचलून पाण्यात फेकलं तेव्हा शिकलो. आप्पा आणि आण्णा हि जोडी जरा पोहून झालं की पाण्यावर हात पाय लांबवून तरंगत राहात अम्हा मुलांना खूप आश्चर्य वाटे. हळू ह्ळू मीही पोहायला, तरंगायला शिकलो. आणि या असे होण्य़ाला Buoyancy म्हणतात हे मात्र नंतर कधीतरी शाळेत कळाले. चपटे दगड पाण्यावर टाकताना तीन चार टप्पे खात जाणही तिथेच शिकलो...

आपले कपडे नदीवर पिळून आणणे हि आप्पांची सवयही नजेरेतून सुटली नव्ह्ती. एकदा मात्र गंम्मत झाली धोतराचा पिळा उघडून आजी वाळत घालू लागली न एक छोटी मासोळी टुनकन उडी मारून फरशीवर पडली. अजूनही आठवतोय आजीचा तो चेहेरा आणि आम्ही हसलो म्हणून ओरडून लगेच आमच्याच सोबत खो खो हसणारे आप्पा.

आप्पा पुजेला बसले की मुलांना वाटे आता त्यांचे लक्ष नाही आप्ण जरा मस्ती करूयात. त्याचे कान मात्र कानोसा घेत रहात. कोणी वात्रटपणा केला की त्यांचा स्त्रोत्रपठणाचा आवाज आणि गती वाढायची. हेच आप्पा नंतर बाजारात गेले की भरपूर खाऊ घेऊन येत. धोतराच्या सोग्यात एखाद दुसरी भाजीची जुडी. फळे असे काहिना काही आणत असत.

आप्पांसोबत बाजारात जाणे हा एक अनुभव असे. त्यांचं भाव विचारणं.....भाव कमी करून मागणं...आणि हवा तो भाव मिळाल्यावर जणू आपण भाजी घेतोय म्हणजे त्याचावर उपकार करतोय अशा आविर्भावात वावरणं...सगळच अजब वाटायचं मला.

आप्पांच्या आवजात एक जरब होती...तरी आतला हळवा माणूस नेहेमी दिसायचा. आप्पांचं व्यवहार्य वागण...त्यांच भविष्याच्या कडे पाहून आधी केलेलं नियोजन....त्यांचं असणारं चोफेर लक्ष...त्यांचं खुलेपणाने नव्या गोष्टी समजून पडताळून पाहून त्यातील योग्य स्वाकारण्याची तयारी....अशा अनेक आठवणि मनात दाटतात.

आयुष्याची जवळ जवळ चाळीस वर्ष आप्पा दिवसातून एकदाच जेवत असत...रात्री एखादं फळ दूध असा आहार....वयाच्या ८० वर्षापर्यंन्त आप्पा खम्बीर आणि शारीरीक दुरुस्त होते.

आप्पा म्हणजे ...

एक अधारवड...भक्कम सावली देणारा

एक नाजूक पारंबी ....झुलावेसे वाटणारी

छोटी लाल्चुटूक फळॆ सगळ्या पाखरांचा मेवा...पुरून खूप सारा ऊरणारा

अनेक फान्द्यांच्या अन ढोल्यांच्या जागा ..ऊबदार ..आश्वस्त...

आप्पांच्या आठवणींमध्ये रममाण झालं की सगळं सलग आठवत जातं. त्यांचं मला शाळेत सोडायला येणं, श्रावणी सोमवारी त्यांचा हात धरून जत्रेला जाणे, खाऊ खेळणी घेणे, कुस्त्यांचा हगामा पहाणे अशा अनेक गोष्टी नजरेसमोरून सरकू लागतात. आप्पा म्हटलं की गाय छापची पुडी आटवते. त्यांची पुडी लपवून ठेवायची आणि त्याबदल्यात काहितरी मागायचे, त्यांनी ते कबूल करायचे असा प्रकार माझा भाऊ करीत असे. खरेतर ते चार आण्याची नवी पुडी सहज आणू शकले असते पण नातवाचा हट्ट पुरविणे त्यांना छान वाटे.

आम्ही थोडे मोठे झालो आप्पाही बदलले....गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असे अनेक गोष्टी सांगू लागले. शिक्षणातील अनेक गोष्टी आप्पांकडून बालपणीच शिकल्यासारख्या वाटत फक्त नव्याने ओळख होई इतकच.

आता पस्तीशीत जेव्हा संगीताचं शिक्षण घेतोय तेव्हाही आप्पाच आठवतात....त्यांचा दिवसभर सुरू असणारा पुणे आणि मुंबई ब चा रेडीओ आणि त्यावरील दिवसाला चार मैफ़िली याच परत भेटतात आताही संगित शिकताना....नकळत घडवलेले संस्कार अप्पांचे.

त्यांच्या आठवणी असंख्य दाटतात मनात....आहेत ते आमच्यात अजूनही...कारण त्यांचाच वसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत......वारसा हक्काने मिळते ती ईष्टेट...आणि संस्कारांने मिळतो तो वसा...आमच्या आप्पांसारखा...

expressing

if you talk a lot ....they get bored

if you dont talk....they r still bored

if u talk in between...u disturb them

if u wait till others complete...ur turn never comes

if u try to suggest while takn...u r always givin gyan

if u dont....u dnt have any gyan

if u raise ur voice while talkn...u r arrogent

if u tk softly...u r darpok

if u make faces while takin...u r taunting

if u r face dosnt express....u r dry

dnt worry whtever way u talk pple will hv smthing to say

bt understand like ther r sme rainy days...some sunny..n some cold...u'll also express differently just do that ...be yourself